सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याने पारलिंगी समुदायातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाळे येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार करत या व्यक्तीने आपल्या भावना व्यक्त केल्या असून संबंधित तरुणावर गंभीर आरोप केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पारलिंगी समुदायातील व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तयार करत संबंधित तरुणावर आरोप केले. या व्हिडिओमध्ये असे म्हटले की, माझे आणि त्याचे मागील आठ वर्षांपासून संबंध आहेत, त्याने माझ्यासोबत लग्न केले आणि मला दुसरीकडे आणून ठेवले. माझ्या समाजाशी माझे संबंध तोडले आणि आता तो दुसरे लग्न करत आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत असून याला पूर्णपणे तोच जबाबदार आहे, असा दावा पारलिंगी ससमुदायातील व्यक्तीने केला आहे. या घटनेनंतर सोलापूरच्या शासकीय रुग्णालय परिसरात पारलिंगी समुदायातील व्यक्तींनी मोठी गर्दी केली असून आरोपी तरुणावर कारवाई करण्याची मागणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केली आहे.
या घटनेसंदर्भात पारलिंगी समुदायातील गुरूंनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पारलिंगी समुदायातील व्यक्तीचे एका तरूणाशी प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. एक वर्षभर आम्हाला भेटू दिले नाही. कोणाशीही बोलू दिले नाही. घराच्या बाहेर जाऊ दिले नाही. मारहाण देखील केली. तो तरूण दुसरीकडे लग्न करत आहे. माझ्या शिष्याने मरण्यापूर्वी केलेला व्हिडीओ देखील आमच्याकडे आहे. त्या व्हिडीओमध्ये माझ्या शिष्याने सगळे सांगितले आहे. फसवणूक केलेल्या तरूणावर तातडीने कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी देखील पारलिंगी समुदायातील गुरूंनी केली आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचे 12 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होते. त्या तरुणाने फसवणूक करून पैसे, सोने सर्वकाही लुटले. जिथे राहत होता तिथून दुसरीकडे राहण्यासाठी घेऊन गेला. मारहाणही करत होता. त्या तरुणाने फसवणूक केली आणि आता दुसरीकडे लग्न करत आहे आणि त्यामुळेच आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.