सोलापूर, वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन भयंकर अपघात घडले आहेत. माळशिरस-अकलूज रोडवरील देव वकील वस्ती जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. अकलूज रोड देव वकील वस्ती जवळ पहाटे साडेपाच ते पावणे सहा या दरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास चांगदेव किसन सर्जे (वय ५५) आणि दिलीप पंढरी कांबळे (वय ४५) हे दोघेही आपल्या मित्रासोबत रोडवर फिरत असताना सिताराम महाराज आर्ट्स या दुकाना जवळ, देव वकील वस्तीजवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात चांगदेव सर्जे आणि दिलीप कांबळे हे जागीच ठार झाले, तर शंकर बळीबा देशमुख (वय ६१) गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत चैतन्य मल्हारी सर्जे यांनी माळशिरस पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास माळशिरस पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी स पो नि जानकर साहेब करीत आहेत. तर मोहोळ येथील यावली गावाजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर शिक्षक राजेंद्र सुखदेव कारंडे (वय ५७) आणि विजय नामदेव राऊत (वय ६५) हे स्कूटीवर शाळेच्या कामासाठी जात असताना, त्यांना मालट्रकने पाठीमागून धडक दिली.
राजेंद्र कारंडे यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर विजय राऊत हे जखमी झाले. जखमींना तात्काळ सोलापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक अडचणीत आली होती. या घटनेची माहिती माळशिरस आणि मोहोळ पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, संबंधित वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.