सोलापूर वृत्तसंस्था
२३ डिसेंबरपासून सोलापूरमधून विमानसेवा सुरू होण्याची घोषणा ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती. मात्र विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यातील रखडलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे २३ रोजी होणारे पहिले उड्डाण रद्द करण्यात आले आहे. फ्लाय ९१ या कंपनीकडून यासाठी धुक्यासह इंधन भरण्यासाठीच्या सुविधेचे कारण दिले आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी होटगी रोड येथील विमानतळाच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना २३ डिसेंबरपासून गोवा येथील फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा गोवा व मुंबई मार्गावर सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र मागील अनेक दिवसांपासून विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यातील विविध करार अजून बाकी असल्याचे सांगितले जाते. विमानासाठी लागणारे इंधन भरण्याची सुविधा सोलापूर विमानतळावर असावी अशी विमान कंपनीची मागणी आहे.