ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून

मृतदेहाचे तुकडे शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले

सोलापूर, वृत्तसंस्था 

 

सोन्याच्या हव्यासापोटी सालगड्याने आपल्याच शेत मालकाचा निर्घृण खून केल्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी येथे घडला. संशयित मारेकर्‍याने मृत शेतकऱ्याच्या शरीराचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरून ठेवल्याचे पोलीस तपासातून उघडकीस आले आहे. हा खून एकट्याने सालगड्याने केल्याची प्राथमिक माहिती असली तरी त्याच्यासोबत अन्य साथीदार आहेत किंवा कसे, याबाबत मोहोळ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कृष्णा नारायण चामे (वय ५२) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शेतमजुराला अटक केली आहे. मृत कृष्णा चामे हे बेपत्ता झाल्याबाबत त्यांच्या घरच्या मंडळींनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. पोलिसांच्या तपासात कृष्णा चामे यांच्या ठाव ठिकाणाबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. तपासात मृत चामे यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत असलेल्या सचिन भागवत गिरी याने दिलेल्या माहितीनुसार कृष्णा चामे यांना एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी वर बसवून नेल्याचे समोर आले. त्यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखून मोहोळ पोलिसांनी कृष्णा चामे यांच्या बेपत्ताऐवजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याबाबतही कोणतेही धागेदोरे सापडत नव्हते. सालगडी सचिन गिरी याची पुन्हा विश्वासात घेऊन चौकशी केली असता विसंगत माहिती मिळू लागल्याने पोलिसांनी सालगड्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता शेवटी या गुन्ह्याची उकल झाली. त्याने हा गुन्हा स्वतः केल्याची कबुली दिली.

कृष्णा चामे हे अंगावर १८-१९ तोळे सोन्याचे दागिने वापरत होते. हेच सोन्याचे दागिने परस्पर लाटण्याचा सालगडी सचिन गिरी यास मोह झाला. त्यामुळेच त्याने कृष्णा चामे यांच्या डोक्यात सुरुवातीला हातोड्याने प्रहार करून त्यांचा खून केला. नंतर धारदार शस्त्राने शरीराचे तुकडे तुकडे करून ते वेगवेगळ्या पॉली कॅप कॅरीबॅग मध्ये भरले आणि घरासमोरील शौचालयाच्या शोष खड्ड्यामध्ये पुरून ठेवले. मृत कृष्णा चामे यांच्या अंगावरील संपूर्ण सोन्याचे दागिने काढून घरासमोर खड्ड्यात पुरल्याची माहितीही उजेडात आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता सालगडी सचिन गिरी याच्याविरुद्ध धाराशिव जिल्ह्यात यापूर्वी तीन जबरीचोरीविषयक गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र त्याच्यासोबत अन्य साथीदार आहेत किंवा कसे, याचा उलगडा लगेचच झाला नाही. त्यावर पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!