ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर : आठ रेल्वेगाड्या रद्द, तडवळजवळ रूळ खचले !

राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा कहर सुरु असतांना गेल्या चार दिवसांपासून भीमा नदीजवळ २०० मीटर लांबीचे रूळ खचले. सोलापूर शहरापासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या तडवळ ते लच्याण दरम्यान ही घटना घडली असून त्यामुळे ८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर बुधवारी पहाटे निघालेली मुंबई- होसपेट एक्स्प्रेस मधेच रद्द करण्यात आली. त्याच्या ७०० प्रवाशांना सोलापूरहून पुढे जाण्यासाठी बसची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

होसपेट एक्स्प्रेसने पहाटे पोहचलेल्या प्रवाशांसाठी सोलापूर विभागाच्या प्रशासनाने नाश्त्याची सोय केली. शिवाय सोलापूर, कलबुर्गी, पंढरपूर, वाडी येथे रेल्वे स्थानकांवर हेल्प डेस्क सुरू केले. त्याच्या सुमारे ५०० प्रवाशांना ६ एसटीबस आणि ३ खासगी प्रवासी वाहनाने विजयपूर, होसपेटकडे दुपारी बारा वाजता रवाना करण्यात आले. प्रत्येक वाहनात रेल्वेचे तिकीट निरीक्षकही देण्यात आले. उरलेल्या प्रवाशांनी तिकिटे रद्द करून स्वत: प्रवास करण्याचा निर्णय घेतला.

या गाड्या झाल्या रद्द
मुंबई – होसपेट
होसपेट – मुंबई
म्हैसूर – बागलकोट
बागलकोट – मैसूर
मैसूर – पंढरपूर
पंढरपूर – मैसूर
धारवाड – सोलापूर
सोलापूर – होसपेट (उद्या, परवा)

पावसामुळे भीमानदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे रुळाखालील मातीचा भाग खचला. होसपेटकडून सोलापूरकडे निघालेले इंजिन मध्यरात्री दीडच्या सुमारास तडवळ ते लच्याणदरम्यान रुळावरून घसरले. त्यानंतर रूळ खचल्याची बाब लक्षात आली. पावसामुळे रुळाखालील माती खचल्याने तडवळ ते लच्याणदरम्यान रुळही खचला. त्यामुळे रेल्वेची सेवा काहीअंशी प्रभावीत झाली. तो परिसर हुबळी विभागाच्या अंतर्गत आहे. त्यांच्याकडून रूळ बदलण्याचे काम सुरू झाले आहे. असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक निरजकुमार दोहर म्हणाले.मैसूरला जाण्यासाठी सकाळी ९.२५ वाजता गाडी होती. ती रद्द झाल्याचे समजले. आम्ही १४ खेळाडू स्थानकावरच थांबलो.असे हँडबॉल खेळाडू श्रीकरने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!