सोलापूर, वृत्तसंस्था
रिटेल क्षेत्रात यशाचा आणि लाखोंच्या कमाईचा एक्सलंट मार्ग अशी विषयांकित जाहिरात संशयित आरोपीने प्रसिद्ध केली. महिन्याला लाखो रुपये मिळतील, असे आमिष दाखवून स्टॉकिस्ट म्हणून मोंढे एन्टरप्रायझेस या फर्मचे भवानी पेठेतील सिद्धेश्वर वसतिगृह येथील गोडाऊनचे नूतनीकरण करायला भाग पाडून ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची मनिषा विष्णू मोंढे (रा. अंत्रोळीकर नगर भाग-२, होटगी रोड) यांनी सदर बझार पोलिसांत दिली.
याप्रकरणी सचिन मलिक पाटील (रा. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गोडावूनच्या नूतनीकरणासाठी सुमारे १३ लाख रुपये खर्च करायला भाग पाडले. २३ मे ते २ सप्टेंबर २०२४ या काळात संशयित आरोपीने फर्निचर व माल पाठविण्यासाठी ३० लाख रुपये घेतले. त्यातील १० लाख रुपयांचा माल संशयिताने पाठवून दिला.
पण, तो विकला गेला नाही आणि ठरल्याप्रमाणे तो समोरील व्यक्ती माल परत घेऊनही गेला नाही. ४ जानेवारीला नोटरी करार करून संशयित आरोपीने विश्वास संपादन केला. त्याने विश्वासघात करून ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही मनिषा मोंढे यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.