सोलापूर : प्रतिनिधी
एका अनोळखी व्यक्तीचा खून करून पळून गेलेल्या गणपत उर्फ सुनिल गायकवाड (रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) या आरोपीस सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. याद्वारे रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या हत्येचे गूढ उलगडले.
सविस्तर वृत्त असे कि, २६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील बाजुस सिंमेट गोदामाजवळील मोकळ्या जागेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळुन आला होता. मयताच्या अंगावर जखमा होत्या व त्याचा खून झाल्याचे समजुन आले. सदर मयत व्यक्तीबाबत तपास करताना त्याचे नाव संतोष बाबुराव घुमटे (वय-४५, रा-राजेश कोठे नगर, दमाणीनगर, सोलापूर) असे असल्याचे समजले. त्यावरून त्याच्या नातेवाईकांना बोलावून घेण्यात आले होते. मयताचा भाऊ विजयकुमार गुमटे (वय-३८, रा.राजेश कोठे नगर, दमाणी नगर, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली होती.
या खुनाबाबत अज्ञात आरोपी विरुध्द सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडे तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानुसार शोध घेत असताना पोसई नितीन शिंदे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून गणपत उर्फ सुनिल गायकवाड याच्याविषयी माहिती मिळाली.
मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलीस उप-निरीक्षक नितीन शिंदे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच आरोपीने यातील मयताचा चोरलेला मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आला आहे.