ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूर मनपा पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष; बैठकीत नेतृत्वावर रोष

सोलापूर : वृत्तसंस्था

मनपा निवडणुकीत अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलेल्या काँग्रेसमध्ये पराभवानंतरचे कवित्व सुरू झाले आहे. आत्मचिंतनासाठी खासदार प्रणिती शिंदे व प्रभारी मोहन जोशी यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी नेतृत्वाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली.

प्रणिती शिंदे यांनी अपेक्षित बळ दिले नसल्याची तक्रार उमेदवारांकडून करण्यात आली. मात्र थेट टीका करण्याचे धाडस कुणीही केले नाही. त्याऐवजी शहराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक चेतन नरोटे यांना लक्ष्य करत उमेदवारांनी आपला राग व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक २२ मधून माजी महापौर संजय हेमगड्डी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या पत्नी राजनंदिनी, तसेच ब्लॉक अध्यक्ष गायकवाड यांचे पुत्र शीतल यांनी निवडणूक लढवली होती. मात्र या प्रभागात काँग्रेसच्या चौघांचाही पराभव झाला, तर ‘एमआयएम’ दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

या पराभवाबाबत संजय हेमगड्डी म्हणाले, “शहराध्यक्ष चेतन नरोटे स्वतः उमेदवार असल्याने इतर प्रभागांकडे दुर्लक्ष झाले. निवडणुकीपुरते तरी प्रभारी अध्यक्ष नेमणे गरजेचे होते. यापूर्वी १९९९ व २००२ मध्ये शहराध्यक्षांनी प्रभारी नेमल्याने पक्षाला यश मिळाले होते. मात्र यावेळी सर्व अधिकार स्वतःकडे ठेवल्यामुळे पक्षाची यंत्रणा उमेदवारांपर्यंत पोहोचली नाही. प्रचाराचे नियोजन आम्हालाच करावे लागले.”

दरम्यान, बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी पक्षविरोधकांची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, “पक्षावर टीका करणाऱ्यांनी घरी बसावे,” अशा शब्दांत खडेबोल सुनावले. यापुढे मैदानात उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अधिक ताकद दिली जाईल. पक्ष बळकट करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन केली जाईल. पराभूत उमेदवारांनी ‘शॅडो नगरसेवक’ म्हणून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले. तर भाजप नव्हे तर ‘ईव्हीएम’ निवडून आल्याची टीका माजी आमदार मोहन जोशी यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!