सोलापूर, दि.24(जिमाका):- कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने दिनांक 3 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्देशीत केले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील एकल कलाकाराकडून अर्ज मागविण्यात आले. जिल्हास्तरीय समितीकडे 222 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी उपरोक्त शासन निर्णयातील निकषाप्रमाणे चाळीस कलाकारांना एकरकमी प्रत्येकी 5 हजार अर्थसाह्य जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मंजूर केले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसाह्य देण्याबाबतच्या जिल्हास्तरीय निवड समितीच्या बैठकीस निवड समितीचे सदस्य सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील, तहसीलदार वाकसे , जिल्हा सूचना अधिकारी श्री. कुलकर्णी व समितीचे सर्व अशासकीय सदस्य उपस्थित होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धोत्रे यांनी कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसाह्य देण्यासाठी असलेल्या जिल्हास्तरीय निवड समितीच्या रचनेविषयी माहिती देऊन कलाकारांना अर्थसाह्य देण्याबाबत राबवलेल्या प्रक्रियेची माहिती समिती सदस्यांना दिली. समितीकडे प्राप्त झालेल्या 222 अर्जावर छाननी समितीने शासन निर्णयातील तर निकषाप्रमाणे त्या कलाकारांच्या नावाची यादी जिल्हास्तरीय निवड समितीकडे सोपवली व त्यावर जिल्हास्तरीय समितीने निवड झालेल्या 40 कलाकारांना एक रकमी अर्थसाह्य देण्यास सर्वानुमते संमती दिली.