सोलापूर,दि.12- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाला पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर’ हा चाणक्य ज्युरी विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे.
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी देशातील एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. या संस्थेने कोलकाता येथे 11 नोव्हेंबर 2022 रोजी हॉटेल फेअरफिल्ड मॅरिएट येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. हा पुरस्कार विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ .जी .एस .कांबळे आणि मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी स्वीकारला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाचे संस्थापक एम .बी . जयराम आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया ही जनसंपर्क व जाहिरात क्षेत्रात राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. भारतातीत विविध राज्यात तसेच संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका इत्यादी देशातही या संस्थेच्या शाखा आहेत. या संस्थेतर्फे चाणक्य ज्युरी पुरस्कारांसाठी देशभरातून विविध प्रस्ताव मागविण्यात आले होते .या संस्थेने नेमलेल्या तज्ञ समितीने आलेल्या प्रस्तावांची छाननी करून विविध निकषांच्या आधारे निवड केली.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाची ‘कम्युनिकेशन स्कूल ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करताना विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेले उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी सुविधा,सुरू केलेले विविध अभ्यासक्रम,विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट, विभागातर्फे मागील वर्षभरात आयोजित केलेले शैक्षणिक कार्यक्रम,संशोधन इत्यादी निकषांच्या आधारे या चाणक्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली .
हा पुरस्कार स्वीकारताना कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले की मास कम्युनिकेशन विभाग हा उपक्रमशील विभाग आहे. या विभागांमध्ये उभारण्यात आलेल्या टीव्ही आणि रेडिओ स्टुडिओच्या माध्यमातून विभागात विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत .सर्व गोष्टींची दखल पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाने घेऊन राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार देऊन विभागाचा गौरव केला याचा मला आनंद वाटतो. सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ .जी . एस .कांबळे म्हणाले की सामाजिक शास्त्रे संकुलातर्फे सातत्याने सांघिक स्तरावर चांगले कार्य जाते. या पुरस्कारामुळे संकुलाचा आणि विद्यापीठाचाही गौरव झाला आहे .
मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर म्हणाले की कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी या विभागाच्या प्रगतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करणे व विविध उपक्रम राबविणे शक्य झाले त्यामुळेच हा पुरस्कार मिळू शकला. संकुलाचे संचालक डॉ. कांबळे यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन आणि विभागातील शिक्षकांनी केलेले चांगले कार्य याचा हा गौरव आहे.
मास कम्युनिकेशन विभागाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यापीठाचे प्र -कुलगुरू प्रा . राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे , वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर आदींनी अभिनंदन केले आहे.