मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. मराठी अस्मिता आणि मातृभाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंच्या भूमिकेला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी भूमिका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली. मराठी विरोधकांच्या विरोधात एकत्र उभे राहण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपच्या महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्वेषी भूमिकेविरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. माय मराठीच्या अस्मितेसाठी, सन्मानासाठीच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसेच महाराष्ट्र पहिलीपासून हिंदी सक्तीला सर्वांचाच विरोध आहे. पण भाजप जाणीवपूर्वक हिंदीची सक्ती करत होता. जनतेच्या रेट्यामुळे त्यांना जीआर रद्द करावा लागला आहे. हिंदी, उर्दू, तेलुगू, कन्नड या भाषाही राज्यात शिकवल्या जातात, पण त्याची सक्ती नाही, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
वर्षा गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा देऊन आपली लाचारी दाखवत महाराष्ट्राचा अपमान केला.
तसेच शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या छत्रपती संभाजीराजेंबाबतच्या वक्तव्यावरही वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज व मराठीचा अपमान केला. शिंदेसेना व एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे.