नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस भाजपचा जोरदार विरोध करीत असतांना राज्यात नागपूर येथे भव्य सभेची जोरदार तयारी सुरु असतांना या सभेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुवारी अचानक आजारी पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कन्या प्रियांका गांधी नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही स्टार नेत्यांच्या गैरहजेरीतच आता काँग्रेसला आपल्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकावे लागणार आहे.
काँग्रेसने आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठा जोर लावला आहे. या अंतर्गत थआपल्या 139 व्या वर्धापन दिनानिमित्ताने काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असणाऱ्या नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी या रॅलीत पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्याशिवाय काँग्रेसचे सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री या रॅलीला उपस्थित राहणार आहेत.
नागपूर शहरालगतच्या दिघोरी नाका भागातील मैदानात काँग्रेसची ही मेगारॅली होणार आहे. या मैदानाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आले आहे. या रॅलीसाठी काँग्रेसचे राज्यासह देशभरातील कार्यकर्ते व नेते एकवटलेत. पण आता ताज्या माहितीनुसार, सोनिया गांधी अचानक आजारी पडल्यामुळे त्या या रॅलीपासून स्वतःला दूर ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही घरी थांबणार आहेत. त्यामु्ळे त्या ही या सभेला येवू शकणार नाहीत, असे वृत्त एका हिंदी ऑनलाईन संकेतस्थळाने दिले आहे.