सोलापूर : वाराणसी तथा काशीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिव्य काशी भव्य काशी या संकल्पेनतून आता दक्षिण तालुका धार्मिक पर्यटनासाठी पुढे आणणार आहे. त्याची सुरूवात सोमवार, 13 डिसेंबर रोजी हत्तरसंग कुडल येथून करणार आहे, अशी माहिती आ. सुभाष देशमुख यांनी दिली.
काशी च्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सौंदर्यीकरणासाठी पंतप्रधान मोदी यांनी गेल्या 7 वर्षांत अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या आहेत. या योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 डिसेंबर रोजी होणार आहे. याचे देशभरात सुमारे 51 हजार ठिकाणी ’ दिव्य काशी-भव्य काशी’ या कार्यक्रमाचे पडद्यावरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. हत्तरसंग कुडल येथील मंदिरातही या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता होणार्या या कार्यक्रमास दक्षिण तालुक्यातील सर्व पुजारी, महाराज, साधू, संत कीर्तनकार, धर्माचार्य उपस्थित राहणार आहेत.
आ. देशमुख म्हणाले की, दक्षिण तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. याची माहिती जिल्ह्यातील लोकांना व्हावी म्हणून आणि दक्षिण तालुका पर्यटनात अग्रेसर करण्यासाठी हत्तरसंग कुडल येथे कार्यक्रम होत आहे. यानंतर तालुक्यातील विविध धार्मिक स्थळी, मंदिरात अथवा मठात, अन्य ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. सर्व मंदिराच्या तसेच मठ, आश्रमात, अन्य धार्मिक ठिकाणी स्वच्छता अभियानाचे आयोजन केले जाणार आहे. सर्व साधू, संत, पुजार्यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांना तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहनी आ. देशमुख यांनी केले आहे.