श्रीगुरुपौर्णिमा उत्सव धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात !
अन्नछत्र मंडळाकडून दहा दिवस कार्यक्रमांची रेलचेल; धर्मसंकीर्तनाची तयारी अंतिम टप्प्यात
अक्कलकोट : प्रतिनिधी
राज्यासह भारत देशातच नव्हे तर परदेशात श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांचा महाप्रसाद म्हणून श्री भक्तांतून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३७ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सव धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, दि.११ जुलै पासून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची संस्थापना, संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी ३७ वर्षापूर्वी सन १९८८ साली केली होती. वर्धापन दिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सव धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम सन २०२४ यंदाचे २५ वे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. दि. २१ जुलै पर्यंत धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाची आखणी व मांडणी करण्यात आलेली आहे. यामध्ये न्यासाच्या आवारात उभा करण्यात आलेल्या शामियाना मंडप, यात्री निवास व भुवन, महाप्रसादालय आदी ठिकाणी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील पालखी मार्गावर कापडी भगवे पताका, विविध मार्गावर कमानी, धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे फलक लावण्याचे काम प्रगती पथावर आहे.
सदरच्या कार्यक्रमांना हजारो भाविकांची उपस्थिती असते, त्यामुळे विविध उपाय योजना न्यासाने हाती घेतलेले आहेत. या सर्व कार्यक्रमाकरिता न्यासाचे सेवेकरी, पदाधिकारी, कर्मचारी हे कार्यरत आहेत. सध्या आषाढी वारीमुळे वारकरी यांची रेलचेल पाहता महाप्रसादाकरिता चोख नियोजन करण्यात आलेले आहे. भक्तांची सोय, स्वच्छता, नम्रसेवा याला महत्त्व देऊन न्यास कार्यरत आहे.
दहा दिवसाच्या कार्यक्रमात संगीत, भक्तीगीते, गुणीजन व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, भावगीते, धम्माल विनोदी कार्यक्रम, किर्तन, नृत्य, अभंगवाणी, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमास प्राधान्य, व गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, नामस्मरण, जप व श्री गरुपुजेचे आयोजना बरोबरच पालखी उत्सव आदी कार्यक्रम होणार आहेत.
गुरुपौर्णिमा उत्सव तयारी पाहता अन्नछत्र मंडळात श्री स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, या उत्सवाकरिता राज्यातील नव्हे तर सातासमुद्रापलिकडील स्वामीभक्त अन्नछत्र मंडळात दाखल होत असतात. या नयनरम्य सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, बाळासाहेब पोळ, निखिल पाटील, पिंटू साठे, गोटू माने, योगेश कटारे, प्रवीण घाटगे, महांतेश स्वामी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.