मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसापासून राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने खिल्ली उडविली होती. त्यानंतर राज्याचे चांगलेच राजकारण तापल्यानंतर आता पुन्हा एकदा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एका निवेदनाद्वारे आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जे म्हटले त्याचा पुनरुच्चार केल्याचा दावा करत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मला या जमावाची भीती वाटत नाही. त्यामुळे मी लपून बसत प्रकरण शांत होण्याची वाट पाहणार नाही. मी काहीही चुकीचे बोललो नाही. अजित पवार (पहिले मुख्यमंत्री) यापूर्वी जे म्हणाले होते तेच मी म्हणालो, असे त्याने म्हटले आहे.
कुणाल कामराने आपल्या कवितेवरून तोडफोड झाल्यानंतर जवळपास 24 तासांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते आपल्या 4 पानी निवेदनात म्हणाले, “मी माफी मागणार नाही. अजित पवार (प्रथम उपमुख्यमंत्री) हे एकनाथ शिंदे (द्वितीय उपमुख्यमंत्री) यांच्याविषयी जे म्हणाले होते, तेच मी म्हणालो. मी या जमावाला घाबरत नाही आणि मी पलंगाखाली लपून बसून प्रकरण शांत होण्याची वाटही पाहणार नाही.”
ते म्हणाले, “मनोजरंजनाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला (शूटिंगचे स्थळ) ते फक्त एक व्यासपीठ आहे. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांची ती जागा आहे. हॅबिटेट (किंवा इतर कोणतेही ठिकाण) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही. मी काय बोलतो किंवा करतो याचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. त्यांचे माझ्यावर नियंत्रणही नाही. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा यात संबंधही नाही. विनोदी कलाकारांच्या शब्दांसाठी अशा सेटवर हल्ला करणे म्हणजे चिकन दिले नाही म्हणून तुम्ही टोमॅटोचा ट्रक पलटी केल्यासारखी निरर्थक गोष्ट आहे.”
कुणाल कामराने आपल्याला धडा शिकवण्याची धमकी देणाऱ्या नेत्यांवरही बेधडक मत व्यक्त केले. तो म्हणाला, “भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा वापर केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची खुशामत करण्यासाठी केला जाऊ नये. आजच्या माध्यमांनी आपल्याला असे करण्यास सांगितले तरी आपण तसे करू नये. एका ताकदवान व्यक्तीच्या किंमतीवर एक विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझ्या अधिकाराचे स्वरुप बदलू शकत नाही. माझ्या माहितीनुसार, आमच्या नेत्यांची आणि राजकीय व्यवस्थेची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही.”
“तथापि, माझ्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी पोलिस आणि न्यायालयाला सहकार्य करण्यास तयार आहे. पण ज्यांनी विनोदाने नाराज होऊन तोडफोड केल्याच्या घटनेला एक वाजवी प्रतिक्रिया मानले, अशा लोकांना न्याय्य आणि समान कायदा लागू होईल का? आज कोणतीही पूर्वसूचना न देता हॅबिटेटवर पोहोचलेल्या आणि हातोड्याने ते ठिकाण उद्ध्वस्त करणाऱ्या निवडून न आलेल्या महापालिका सदस्यांनाही लागू होईल का?”
“कदाचित माझे पुढचे ठिकाण एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील दुसरे एखादे ठिकाण असेल ज्याला पाडण्याची नितांत गरज आहे.”