उद्या अक्कलकोट दौऱ्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
विविध विकासकामांचे होणार भूमिपूजन, आमदार कल्याणशेट्टी यांची माहिती
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (मंगळवारी )अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे.त्या अनुषंगाने फडणवीस यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत माहिती देताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले की,महायुती सरकारने अक्कलकोटच्या विकासासाठी नेहमी झुकते माप दिलेले आहे. इतका निधी तालुक्याला कधी मिळालेला नाही. खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटसाठी अनेक योजनांना मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.
यात अक्कलकोट येथील उपजिल्हा रुग्णालयाला ११० कोटी, अक्कलकोट शहराच्या अमृत – २ या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी ७२ कोटी,देगाव शाखा कालव्याचे जलपूजन, वितरिका क्रमांक एक व दोनचे भूमिपूजन, दुधनी नगर परिषदेसाठी ४७ कोटीची नवीन पाणीपुरवठा, अक्कलकोट नगर परिषदेच्या विविध रस्ते प्रकल्पासाठी ११४ कोटीचे भूमिपूजन, मैंदर्गी नगर परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे २६ कोटीचे भूमीपूजन,अक्कलकोट- तडवळ- कोर्सेगाव रस्ता,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
अशा विविध रस्ते कामांनाही कोट्यावधी रुपयांचा निधी नुकताच मंजूर झाला आहे.
ही सर्व कामे आता लवकरच सुरू होत आहेत.या सर्व कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.या दौऱ्या दरम्यान फत्तेसिंह मैदानावरील जाहीर सभेतच कुरनूर धरणातील पाण्याचे पूजन देखील केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एकरूख उपसा सिंचन योजनेला त्यांनी सुप्रभा दिलेली आहे.त्यांच्यामुळे या योजनेचे काम पूर्णत्वास गेल्याने त्यांच्याच हस्ते उजनीच्या पाण्याचे पूजन केले जाणार असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व शहराध्यक्ष शिवशरण जोजन यांनी दिली आहे.भूमिपूजन सोहळ्यानंतर अक्कलकोट येथील फत्तेसिंह मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकाळी १० वाजता जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेला जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत.तरी या सभेला तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी,नेते मंडळी व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अक्कलकोट शहर व तालुका भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.
सभेकडे तालुक्याचे लक्ष
काही दिवसांपूर्वी चपळगाव येथे काँग्रेसने कृतज्ञता मेळाव्याच्या माध्यमातून उजनीच्या पाण्याचे पूजन करत भाजपवरती जोरदार टीका केली होती.आता या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते मंडळी त्याला काय प्रत्युत्तर देणार याकडे तालुकावासियांचे नजरा लागल्या आहेत.