मुंबई : वृत्तसंस्था
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ ‘कॅप्टन’ अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाच्या सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, या पथकाच्या प्रमुखपदी आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य गृह विभागाच्या निर्देशानुसार, अशोक खरात याच्याविरुद्ध नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर (शिर्डी) येथे नोंदवण्यात आलेल्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास आता एकत्रितपणे SITमार्फत केला जाणार आहे. महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाने संबंधित सर्व केस डायरी, पुरावे आणि जप्त साहित्य तातडीने या पथकाकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.
अशोक खरात याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. तसेच नाशिक ग्रामीणमधील वावी पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याशिवाय, अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यात पीडितेचे खासगी फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, खरातच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राइव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या व्हिडिओंमधील महिलांची ओळख पटवणे, या मागील संभाव्य रॅकेट, तसेच राजकीय आणि धार्मिक संबंधांची चौकशी SITमार्फत केली जाणार आहे. यासोबतच, खरातच्या मालकीच्या ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’मधील आर्थिक व्यवहारांचीही कसून तपासणी होणार असून, या प्रकरणातील धागेदोरे उलगडण्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.