मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्याची माहिती पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिली.
जेपी नड्डा यांनी याविषयी माहिती देताना,”बैठकीत सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सर्व सदस्यांच्या सूचना घेण्यात आल्या, त्यानंतर राधाकृष्णन यांचे नाव मंजूर करण्यात आले असे म्हटले. उद्या होणाऱ्या एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत सीपी राधाकृष्णन देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तामिळनाडूचे रहिवासी असलेले सीपी राधाकृष्णन यांची गणना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जाते.
२० ऑक्टोबर १९५७ रोजी तामिळनाडूतील तिरुप्पूर याठिकाणी जन्मलेले राधाकृष्णन यांचे राजकीय जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि जनसंघाशी जोडले गेले आहे. सीपी राधाकृष्णन यांनी ७० च्या दशकात आरएसएसचे स्वयंसेवक म्हणून सक्रिय राजकारणाचा मार्ग स्वीकारला. यानंतर, ते भारतीय जनसंघाच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य झाले आणि संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावली. बराच काळ कार्यकर्ता म्हणून काम केल्यानंतर, १९९४ मध्ये त्यांची तामिळनाडू भाजपचे सचिव म्हणूनही नियुक्ती झाली.
शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी कोइम्बतूर येथील व्ही.ओ. चिदंबरम कॉलेजमधून बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) केले आहे. राधाकृष्णन हे त्यांच्या कॉलेजमध्ये टेबल टेनिस चॅम्पियन आणि लांब पल्ल्याचे धावपटू आहेत. त्यांना क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळायलाही आवडते.