मुंबई : वृत्तसंस्था
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होईल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अधिवेशन नेमके कधी सुरू होणार याबाबत गेले काही दिवस अनिश्चितता होती. ती आज संपली. पहिल्या आठवड्यात ७ आणि ८ तारखेला कामकाज होईल. ९ आणि १० डिसेंबर म्हणजे शनिवार, रविवारी सुटी असेल. ११ ते १५ डिसेंबर असे पाच दिवस सलग कामकाज होईल. १६ आणि १७ ला शनिवार, रविवारची सुटी असेल. १८, १९, २० डिसेंबर असे तीन दिवस कामकाज होईल. २० तारखेला अधिवेशनाचे सूप वाजेल.
विधानभवन येथे झालेल्या विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोन्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध विभागाचे मंत्री, दोन्ही सभागृहाचे सदस्य, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे उपस्थित होते. अधिवेशनाचे एकूण दिवस १४ असून, यामध्ये प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, तर सुट्या चार दिवस असतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केवळ १० दिवसात अधिवेशन गुंडाळले जात असल्याबद्दल टीका केली. १० दिवसात सरकार विदर्भाला काय न्याय देणार, असा सवाल त्यांनी केला.