नंदुरबार प्रतिनिधी : जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम आणि आदिवासी भागात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत आधुनिक शेतीकडे वाटचाल केली असून, स्ट्रॉबेरी उत्पादनातून त्यांनी शेतीत नवी क्रांती घडवून आणली आहे. सातपुडा परिसरातील तोरणमाळ, डाब, वालंबा आदी भागांमध्ये सध्या १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. अनुकूल हवामान आणि मेहनतीमुळे दर्जेदार उत्पादन मिळत असले तरी बाजारपेठेच्या अभावामुळे आदिवासी शेतकरी सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे.
सातपुड्यात पिकवलेली स्ट्रॉबेरी नैसर्गिक पद्धतीने आणि गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम असली, तरी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना बाहेरील बाजारपेठांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र ही बाजारपेठ दूर असल्याने वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यातच बाहेरील बाजारातही अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्ट्रॉबेरी हे नाशवंत फळ असल्याने दीर्घकाळ साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या कोल्ड स्टोरेज किंवा प्रक्रिया यंत्रणेचा अभाव ही आणखी मोठी समस्या ठरत आहे. उत्पादन हाती येऊनही ते वेळेत विक्री न झाल्यास नुकसान सहन करावे लागत असल्याने आदिवासी शेतकरी चिंतेत सापडला आहे. लागवडीसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाकडे विशेष मागणी केली आहे. आदिवासी भागात स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देणे, मोठ्या शहरांमध्ये सातपुड्यातील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या स्ट्रॉबेरीला थेट विक्रीची संधी देणे, तसेच वाहतूक खर्चात सवलत व साठवणुकीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.