अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोटमध्ये आजपासून शासनाच्या नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिली आहे.सोमवारी रात्री आठ वाजल्या पासुनच या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे.
किराणा, वैद्यकीय सेवा, मेडिकल, हॉटेल पार्सल सेवा, शासकीय कार्यालय हे चालू राहणार आहेत. त्याशिवाय इतर कपड्याची दुकाने,जनरल स्टोअर्स, सराफा व्यापारी व इतर दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.दिवसा जमावबंदी आणि रात्री पूर्णपणे संचारबंदी असेल,अशी माहिती मुख्याधिकारी पाटील यांनी दिली.
सोमवारी,दिवसभर कुठली दुकाने चालू राहणार कुठली दुकाने बंद राहणार याबाबत मोठी संभ्रमावस्था पसरली होती.संध्याकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश प्राप्त होताच मुख्याधिकारी पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.आदेश मिळताच अक्कलकोट शहरातून ध्वनिक्षेपद्वारे
सर्व व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली. रात्री आठ वाजल्यापासून दुकाने बंद करण्यासही सुरुवात झाली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी या कडक निर्बंधास सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकारी पाटील यांनी केले आहे.