मुंबई वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना राज्य निवडणूक आयोगाने प्रचारासंदर्भात महत्त्वाचे आणि कडक नियम स्पष्ट केले आहेत. प्रचाराची मुदत संपल्यानंतर सभा, बैठका, मिरवणुका आणि रॅलींवर पूर्ण बंदी राहणार आहे. मात्र उमेदवारांना मतदारांची वैयक्तिक भेट घेण्याची मुभा देण्यात आली आहे. उमेदवार एकट्याने घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधू शकतो, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात पत्रकारांनी मतदानाच्या आदल्या दिवशी कथित पैसे वाटपाच्या तक्रारींबाबत आयोगाची भूमिका विचारली असता, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आचारसंहितेच्या नियमांचा हवाला दिला. पैसे वाटपाच्या तक्रारी आल्यास त्या संबंधित महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येतात आणि ते त्यावर कारवाई करतात, असे त्यांनी सांगितले. सायंकाळी साडेपाच वाजल्यानंतर जाहीर प्रचार करता येणार नाही, तसेच कलम ३७ नुसार पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाघमारे पुढे म्हणाले की, प्रचाराच्या विविध कॅटेगिरी आहेत. सभा, रॅली, मिरवणूक पूर्णपणे बंद असतील, मात्र उमेदवार वैयक्तिकरित्या घरोघरी जाऊ शकतो. डोअर टू डोअर प्रचारासाठी एकट्या उमेदवाराला परवानगी आहे. पाचपेक्षा जास्त लोक एकत्र जाऊन प्रचार केल्यास तो नियमभंग ठरेल. हेच नियम लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनाही लागू होते, असे त्यांनी सांगितले.
पैसे वाटप हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारची घटना आढळल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही निवडणूक आयुक्तांनी दिला. प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवारांना मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात गटाने प्रचार करता येणार नाही, तसेच माईकचा वापरही प्रतिबंधित राहील. हा २०१२ मधील आदेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या या स्पष्ट निर्देशांमुळे ग्रामीण भागातील निवडणुकीत प्रचाराची दिशा बदलण्याची शक्यता असून, विरोधी पक्ष या नियमांवर काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.