मावळ हत्याकांडाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा
माजी मंत्री म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
चार दिवसांपूर्वी मावळ येथे घडलेल्या हत्याकांडाप्रकरणी प्रशासनाने एनडीआरएफची टीम वाढवून मृतांचा शोध घ्यावा आणि त्यांना ५० लाख रुपये आर्थिक सहाय्य करावे,या मागणीसाठी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्र्यांनी या विषयासाठी बराच वेळ दिला होता.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हेत्रे यांनी दिलेल्या निवेदनाची तातडीने दखल घेत संबंधित विभाग तसेच प्रशासनाला मदती संदर्भात आदेश दिले आहेत.चार दिवसांपूर्वी मावळ येथे जी घटना घडली होती.त्यामध्ये मूळचे अक्कलकोटची गवंडी आणि तिकडचे समरीन नेवरेकर कुटुंबियातील ती महिला होती आणि तिचे दोन लहान मुले होते.या तिघांना अमानुष पद्धतीने मारून इंद्रायणी नदीत टाकून देण्यात आले होते.त्या तिघांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही.प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे पण त्यात आणखी वाढ गरजेची आहे.
हा विषय गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी,पीडितांना या प्रकरणात न्याय मिळणे महत्वाचे आहे,असे मुस्लिम समाजाचे नेते अशपाकभाई बळोरगी यांनी सांगितले.त्याशिवाय मागील वर्षीचा शेतकऱ्यांचा रखडलेला पिक विमा मिळावा चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेला वाढीव दर मिळावा त्या संदर्भात त्वरित बैठक लावावी, सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मधील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावेत, या संदर्भातही मुख्यमंत्र्यांची माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी चर्चा केली.याप्रकरणी लक्ष घालून कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
यावेळी बोलताना म्हेत्रे म्हणाले की, मावळ मधील घटना ही अतिशय दुर्दैवी आहे अशी घटना कोणाच्याही बाबतीत होऊ नये गवंडी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे त्यांना आर्थिक मदत मिळावी ही आमची प्रमुख मागणी होती, असे त्यांनी सांगितले यावेळी सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी,मल्लिकार्जुन पाटील व गवंडी कुटुंबिय उपस्थित होते.