जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होण्यासाठी प्रयत्न करा; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या सूचना
सोलापूर,दि.13 : राज्य शासकीय कार्यालये आणि जिल्हा परिषद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ चा निधी खर्च करण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी आतापासूनच सर्व संबंधित यंत्रणांनी तयारी करावी. निधी वेळेत खर्च होण्यासाठी लागणाऱ्या मंजुऱ्या घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चाबाबत आयोजित बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त कैलास आढे यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, प्रत्येक विभागाने खर्चाचे वेळेत प्रस्ताव सादर करावेत. तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मंजुरीचे प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित ठेवू नयेत. जिल्हा नियोजन समितीकडे सर्व मान्यतेसह वेळेत प्रस्ताव सादर करावेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात लागणारी आचारसंहिता, विधानपरिषद निवडणूक यामुळे प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास अडथळे येऊ नयेत, कालावधी कमी मिळणार आहे. यामुळे प्रस्तावांना मंजुरी घेऊन ठेवावी.
प्रत्येक विभागाने तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी काही अडचणी, समस्या असतील त्याबाबत विभागाच्या प्रमुखांशी बोलून सोडविता येतील. २०२३ अखेरपर्यंत निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. यामुळे संबंधित यंत्रणांनी गाफील न राहता प्रस्तावांना तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता मिळवून घ्याव्यात. कृषी, वन, महावितरण, क्रीडा, जिल्हा शल्यचिकित्सक, पशुसंवर्धन, जिल्हा उपनिबंधक, जलसंधारण, नगर प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद यंत्रणांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येत असल्याने त्यांनी प्रस्ताव त्वरित सादर करावेत. मार्चअखेर सर्व यंत्रणांचा निधी खर्च होण्यासाठी दक्षता घ्यावी, सूचनाही श्री. शंभरकर यांनी दिल्या.