सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गेल्या दोन महिन्यापूर्वी लाडकी बहिण योजना जाहीर केली होती, त्यानंतर सरकारने प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले असतांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा मंगळवार (दि. 8) रोजी येथील होम मैदानावर होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाकडून चालू झाली आहे. एकूण पाचशे बाय तीनशे पन्नास आकराचा सभामंडप उभारला जात आहे. तीन मंडप उभे केले जाणार आहेत. नाशिकच्या एक मॅनेजमेंट कंपनीला हे काम दिले आहे. शुक्रवारपासून शंभर कर्मचारी मंडप उभारण्याचे काम करत आहेत.
या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून 400 पेक्षा अधिक बसेसच्या माध्यमातून पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहतील, याचे नियोजन केलेले आहे. होम मैदानावर मंडप उभारण्याचे काम युध्दपातळीवर चालू आहे. व्यासपीठ 80 बाय 40 चा असणार आहे. त्यावर मान्यवरांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याशिवात दिडशे बाय शंभर आणि शंभर बाय पाचशेचे दोन मंडप असणार आहेत. या दोन्ही मंडपांची बसण्याची क्षमता चाळीस हजार असणार आहे. एक मंडप उभारण्यात आला आहे. यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत आहेत. तीन क्रेनच्या माध्यमातून हा मंडप उभा केला जात आहे.
तालुक्यातून येणार्या वाहनांसाठी शहरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बसमध्ये एक तलाठी असणार आहे. महिलांना व मैदानापर्यंत घेऊन येणे व कार्यक्रमानंतर त्यांच्या गावी सोडणे ही जबाबदारी त्यांची राहील. कार्यक्रमाच्या ठिकाणी पाणी, मोबाईल टॉयलेट व आरोग्य पथक या सुविधा असणार आहेत. चारशे बसची सुविधा करण्यात आली आहे.