ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जातीवाचक गावे, रस्ते, वस्त्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव त्वरित सादर करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे निर्देश

सोलापूर, दि.27 : सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यासाठी जिल्ह्यातील गावांची, रस्त्यांची आणि वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

जिल्ह्यातील गावांची, रस्त्यांची, वस्त्यांची नावे बदलणेसंदर्भातील आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त कैलास आढे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, मनपाचे नगर अभियंता संदीप कारंजे, मोहोळचे गटविकास अधिकारी गणेश मोरे, दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी आर.बी. देसाई, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक बी.एम. स्वामी यांच्यासह नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये जातीवाचक नावांची गावे, वस्त्या, रस्ते आहेत. जातीवाचक नावे बदलून महापुरूषांची किंवा लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याची कार्यपद्धती शहरात नगरविकास विभागाने तर ग्रामीण भागात ग्रामविकास विभागाने निश्चित करावी, अशी माहिती श्री. आढे यांनी दिली.

नावे बदलण्याचा परिपूर्ण प्रस्ताव त्वरित जिल्हास्तरीय समितीला सादर करण्याचे निर्देशही श्री. शंभरकर यांनी दिले. जातीवाचक वस्त्या, रस्ते, गावांची नावे बदलण्यासाठी यादी तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!