ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळले : दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी !

कोल्हापूर : वृत्तसंस्था 

राज्यात गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या महत्वाच्या मागण्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असून आता कोल्हापूरमध्ये दत्त दालमिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले ऊस दर आंदोलन चिघळले आहे. ऊस वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात असताना, कारखाना समर्थकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना “ऊस वाहतूक रोखून दाखवाच” अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले, आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दत्त दालमिया साखर कारखान्याने एफआरपीची मोडतोड करून गाळप सुरू केल्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याची संपूर्ण ऊस वाहतूक रोखली. यावेळी कारखाना समर्थकांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले, ज्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय साखर कारखानदार एकत्रित येऊन उसाला पहिली उचल म्हणून 3400 ते 3450 रुपये प्रति टन देत आहेत, जी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही. संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे की, ऊस परिषदेत मागणी केलेल्या 3751 रुपये दराबाबत तोडगा न निघाल्यास, कार्यकर्त्यांनी भूमिगत होऊन आंदोलनाची तीव्रता वाढवावी. सध्या सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत असून, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात मध्यस्थी करून तोडगा काढणे अपेक्षित होते, पण राज्य सरकार आणि कारखानदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!