तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१ : आचेगाव (ता. दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर्सच्यावतीने यंदाच्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन २२५० रूपयांची पहिली उचल देत असल्याची घोषणा जयहिंद शुगरचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी केली आहे. यंदाच्या गळीत हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पुजन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना माने देशमुख म्हणाले की,जयहिंद परिवाराने कायमच शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध गावांमध्ये जलसंधारणाची कामे,पशुपालकांना आधार देण्यासाठी कारखान्याच्या प्रांगणात गोशाळा,ऊस उत्पादकांच्या बांधावर रोखीने हप्ते वाटप करत जयहिंद शुगर्सने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस जयहिंद शुगर्सला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन माने देशमुख यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख, जयवर्धन गणेश माने देशमुख व्हा.चेअरमन विक्रमसिंह पाटील, शालिवाहन माने देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आर.पी. देशमुख, शेतकी अधिकारी चंद्रशेखर जेऊरे, सिध्देश्वर उमरदंड आदी उपस्थित होते.
२६५ वाणाच्या ऊसाला २२११ चा दर..!
जयहिंद शुगरकडून २६५ जातीच्या ऊसाला वेगळा दर जाहीर करण्यात आला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत २६५ चा ऊस देणाऱ्या ऊस उत्पादकांना रिकव्हरी पाहून २२११ रूपये प्रतिटन देणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक बब्रुवान माने देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच यंदाच्या वर्षी १५ लाख टन ऊसाचे गाळप करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी ऊसपुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.