अमृतसर वृत्तसंस्था
पंजाबच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने सुखबीर बादल सुरक्षित आहेत. हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून पोलिसांनी आरोपीकडून पिस्तूल हस्तगत केली आहे.
सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर सिंग बादल पहरेदारांच्या भूमिकेत सेवा देत असताना ही घटना घडली. अचानक नारायण सिंग नावाच्या एका व्यक्तीने पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण सिंग हा दल खालसा या गटाशी संबंधित आहे. त्याने गोळीबार करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नारायण सिंगला अटक करून पिस्तूल जप्त केली आहे. त्याच्याकडून हल्ल्याचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी अधिक चौकशी सुरू आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी हल्लेखोराला वेळीच अडवले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला होताना दिसत असून, तेथील लोकांनी त्वरित कारवाई करत आरोपीला पकडले. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, पण पोलिसांचा अंदाज आहे की, हा हल्ला राजकीय सूडापोटी केला गेला असावा. दल खालसा या गटाचा इतिहास पाहता, त्यांचे कार्य अनेकदा वादग्रस्त राहिले आहे. त्यामुळे या हल्ल्याचा दृष्टीकोन तपासण्यात येत आहे.