मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूप्रकरणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. या प्रकरणी सध्या केवळ प्राथमिक अहवाल समोर आला असून अंतिम अहवाल आल्यानंतरच आपण यावर सविस्तर भाष्य करू, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले आहे.
अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. विशेषतः आमदार रोहित पवार यांनी विविध सादरीकरणांच्या माध्यमातून या दुर्घटनेच्या तपासातील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सुनेत्रा पवार यांनी बराच काळ कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता त्यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांच्या अपघाताची विविध तपास यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून सध्या केवळ प्राथमिक अहवाल समोर आला आहे. हा अंतिम निष्कर्ष नसल्यामुळे पूर्ण अहवाल आल्यानंतरच आपण यावर सविस्तर बोलू, असे त्यांनी सांगितले.
या विमान दुर्घटनेची चौकशी नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA), विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) यांच्यामार्फत केली जात आहे. यापैकी एएआयबीने नुकताच २२ पानी प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात बारामती विमानतळावरील कमी दृश्यमानता, व्हिज्युअल फ्लाइट रूल्स (VFR) नियमांचे उल्लंघन, तसेच विमानतळावरील अपुऱ्या सुविधांमुळे ही दुर्घटना घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अहवालानुसार, विमानाने लँडिंगचा पहिला प्रयत्न केल्यानंतर ‘गो-अराऊंड’ घेतले होते. दुसऱ्या प्रयत्नादरम्यान विमान धावपट्टीच्या डाव्या बाजूला सुमारे ५० मीटर अंतरावर कोसळले. अपघातापूर्वी विमान झाडांवर धडकून खाली पडल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच अपघाताच्या काही क्षणांपूर्वी कॉकपिटमधून “ओह शिट” असा आवाज ऐकू आल्याचा उल्लेखही अहवालात आहे.
मात्र या प्राथमिक अहवालावर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. आमदार रोहित पवार यांनी अहवालातील काही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत एएआयबीने हा अहवाल किती गांभीर्याने तयार केला आहे, यावर शंका व्यक्त केली आहे. तर आमदार अमोल मिटकरी यांनीही सीसीटीव्ही फुटेजचा दाखला देत विमान झाडाला धडकले नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत अंतिम अहवालानंतरच स्पष्टता येणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आता तपास यंत्रणांच्या अंतिम निष्कर्षाकडे लागले आहे.