वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
भारतवंशीय अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. एक पायलट म्हणून ५८ वर्षीय सुनीता बोइंगच्या ‘स्टारलाइनर’ या यानाने मंगळवारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने उड्डाण करणार आहेत. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील केप केनवेरल या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरून हे यान उड्डाण करेल. सुनीता यांच्यासोबत बुच विलमोर हे अंतराळवीर असतील.
१९८८ साली नासाने सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर म्हणून निवड केली होती. त्यांच्याकडे दोन अंतराळ मोहिमांचा अनुभव आहे. यापूर्वी ९ डिसेंबर २००६ साली एक्स्पीडिशन १४/१५ अंतर्गत सुनीता विल्यम्स यांनी पहिली अंतराळ यात्रा केली होती. ११ डिसेंबर २००६ रोजी त्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर दाखल झाल्या होत्या. यानंतर १४ जुलै २०१२ साली विल्यम्स यांनी एक्स्पीडिशन ३२/३३ रशियन सोयुज कमांडर युरी मालेनचेंको व जपानच्या एअरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीच्या फ्लाइट इंजिनीयर अकीहिको होशिदे यांच्यासोबत कझाकिस्तानच्या बैकोनूर येथून अंतराळात जाण्यासाठी उड्डाण केले होते. या वेळी विल्यम्स यांनी प्रयोगशाळेला प्रदक्षिणा घालत संशोधन व तपासासाठी चार महिन्यांचा कालावधी अंतराळात घालवला होता. १२७ दिवस अंतराळात राहिल्यानंतर १८ नोव्हेंबर २०१२ रोजी त्या परतल्या होत्या.