बीड वृत्तसंस्था : जिल्ह्यातून पुन्हा एकदा धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जीएसटी विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर–धुळे महामार्गालगत उभ्या असलेल्या एका कारमध्ये या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आला असून, कारमध्ये कोयता सापडल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
मृत अधिकाऱ्याचे नाव सचिन जाधव असे असून ते बीड येथे राज्य कर अधिकारी म्हणून कार्यरत होते. सचिन जाधव कालपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ततेबाबत पत्नीने बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच आज दुपारी सोलापूर–धुळे महामार्गालगत त्यांची कार आढळून आली.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सचिन जाधव हे कारमध्ये मृत अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे त्यांच्या कारमध्ये एक कोयताही सापडल्याने हा मृत्यू अपघाती नसून घातपाताचा असू शकतो, असा संशय अधिक बळावला आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
दरम्यान, सचिन जाधव यांचा मृतदेह पुढील तपासासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस करत असून, सर्व शक्य त्या कोनातून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.