सूर्यग्रहणामुळे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नित्य दिनक्रमामध्येही बदल; ग्रहण मोक्षानंतर रात्री ८ वाजता नेहमीप्रमाणे महाप्रसाद
अक्कलकोट : अश्विन अमावस्या मंगळवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असल्याने या दिवशी येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नित्य दिनक्रमा मध्ये बदल करण्यात आल्याची माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले यांनी दिली.
ग्रहणाचे वेध मंगळवार दि.२५ रोजी पहाटे ३:३० पासून सुरू होणार आहेत. ग्रहणाचे स्पर्श मंगळवारीच दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी होईल. ग्रहणाचे मध्य सायंकाळी ५ वाजून ४३ मिनिटाला राहणार आहे. यानंतर ग्रहणाचे मोक्ष सूर्यास्ताप्रसंगी सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे अन्नछत्रातील दुपारचा स्वामींचा नैवेद्य होणार नांही. तसेच दुपारचा महाप्रसाद बंद राहील. ग्रहण मोक्षानंतर रात्री ८ वा. नेहमीप्रमाणे महाप्रसाद दिला जाईल, तरी सर्व स्वामी भक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावेत असे आवाहन अमोलराजे भोसले यांनी केले आहे.