अक्कलकोट : प्रतिनिधी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान] येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्तिथीत मोठ्या भक्तीभावाने व अपार श्रद्धेने पार पडला.
पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती पुजारी मंदार महाराज पुजारी व व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत संपन्न झाली.
यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले. त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होणेकरिता स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना खडीसाखर प्रसाद देण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले, त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होवून जन्म सोहळा संपन्न झाला. यानंतर भजनगीत व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकटदीन सोहळा मोठया भक्तीभावात संपन्न झाला. यानंतर सर्व स्वामी भक्तांना जन्म सोहळ्याचे सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात आले.
दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आले. दुपारी ४ ते ६ या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायनसेवा संपन्न झाली. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आज दिवसभरात आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे, पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ, नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे व कर्मचारी, सेवेकरीसह पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते. याप्रसंगी प्रदीप हिंडोळे, बाळासाहेब घाटगे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे, अक्षय सरदेशमुख, श्रीपाद सरदेशमुख, शिवशरण अचलेर, बसवराज आलमद, प्रसाद सोनार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, स्वामीनाथ लोणारी, संजय पवार, अमर पाटील, महादेव तेली, संजय पाठक, सागर गोंडाळ, गिरीश पवार, दीपक जरीपटके, रामचंद्र समाणे, महेश मस्कले आदींसह असंख्य स्वामीभक्त उपस्थित होते.