मुंबई : वृत्तसंस्था
देशातील पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून 2024 च्या लोकसभेची सेमीफायनल भारतीय जनता पक्षाने जिंकली आहे. सेमीफायनल जिंकणारा ‘फायनल’ जिंकतोच असे नाही, पण पंतप्रधान मोदी यांनी ‘फायनल’ जिंकण्याची गॅरंटी दिली आहे. या विजयावर आता ठाकरे गटाकडून टीकास्त्र सोडले जात आहे.
जनतेच्या वतीने एकच मागणे आहे, एक फक्त एक निवडणूक बॅलट पेपरवर घ्यायची हिंमत दाखवा. लोकशाहीसाठी तेवढी एक ‘गॅरंटी’ द्याच! आता यावर काही टिल्ले-पिल्ले सांगतात, ‘‘मग ईव्हीएमने तेलंगणात कसा विजय मिळवला?’’ मोठा दरोडा लपविण्यासाठी थोडा माल मोकळा ठेवून दरोडेखोर पळाले. हीच एक मास्टर स्ट्रटेजी आहे व हीच आधुनिक चाणक्यनीती आहे. पुढची लढाई ही फक्त विचारधारा, हुकूमशाहीविरुद्ध नसून लोकशाहीतील या दरोडेखोरीविरुद्ध आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘लोकशाही’ वाचविण्याची गॅरंटी द्यावी. ईव्हीएमचा मूड म्हणजे जनतेचा मूड नाही. फक्त एकदाच ‘बॅलट पेपर’वर निवडणुका घ्या. म्हणजे ‘गॅरंटी’चे खरे-खोटे उघड होईल! अशी टीका उद्धव ठाकरे गटाने केली आहे. त्यांनी सामनाच्या माध्यमातून ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.