ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकर्‍यांच्या भावना विचारात घेऊन राज्य सरकारकडे बैठक लावू ; चेन्नई सुरत प्रकरणी पालकमंत्र्यांचे आश्वासन

अक्कलकोट, दि.४ : समृद्धी महामार्ग करताना ज्याप्रमाणे शेतकर्‍यांना जो मोबदला दिला आहे, त्याचप्रमाणे सुरत-चेन्नई महामार्गामध्ये गेलेल्या बाधित शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, अशी मागणी अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. दरम्यान या सर्व प्रश्नावर पालकमंत्री विखे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या भावना विचारात घेता राज्य सरकारकडे आपण बैठक लावून याबाबत तोडगा काढू, असे आश्वासन शेतकर्‍यांना दिले.

शनिवारी, पालकमंत्री विखे पाटील हे सोलापूर दौर्‍यावर आले असता याप्रसंगी त्यांनी जिल्हा नियोजन समिती येथे सुरत चेन्नई महामार्ग मध्ये बाधित झालेल्या शेतकर्‍यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकी प्रसंगी शेकडो शेतकर्‍यांनी नियोजन भवनांमध्ये गर्दी करून पालकमंत्री यांच्यासमोर मत मांडले. सुरत चेन्नई महामार्ग साठी कमीत कमी एक लाख ८४ हजार ते बागायतीसाठी सहा ते आठ लाख रुपये पर्यंत मोबदला देण्याच्या नोटिसा शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. परंतु सध्या चालू बाजारभावाप्रमाणे शेतकर्‍यांना शेतीचे मूल्य द्यावे,अशी आग्रही मागणी अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी केली.

समृद्धी महामार्गाला वेगळे आणि सुरत चेन्नई महामार्गाला वेगळा दर कशासाठी असा प्रश्नही उपस्थित केला. सुरत चेन्नई महामार्ग मध्ये बाधित झालेल्या शेतकर्‍यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे वाढीव मोबदलाबाबत निवेदने, ईमेल दिली. परंतु यावत सरकारच्या स्तरावर लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावे, अशी विनंती नगरसेवक महेश हिंडोळे यांनी केली.

चालू बाजार भावाप्रमाणे शेतकर्‍यांना मूल्य द्यावे.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना जो भूसंपादनाचा कायदा आणला होता तो रद्द करावा. या जुन्या कायद्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सुरत चेन्नई महामार्ग अनेक गावामधून गेला आहे त्या ठिकाणी प्लॉटिंग पडले आहेत. त्या प्लॉटिंग प्रमाणे दर द्यावा, त्यासाठी गुणांकांमध्ये वाढ करण्याची मागणी याप्रसंगी शेतकर्‍यांनी केली.

याबरोबरच सुरत चेन्नई महामार्ग करताना शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारे मते घेण्यात आली नाहीत. परंतु एका गावातून महामार्ग जात असताना त्या गावाचे दोन तुकडे होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण गाव विस्थापित होणार आहे. शेतकर्‍यांना अलीकडून पलीकडे जाण्यासाठी रस्त्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, असे सुरेखा होळीकट्टी यांनी सांगितले.यावेळी कार्याध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने पालकमंत्री विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

या बैठकी प्रसंगी खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजाभाऊ राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यासह नॅशनल हायवेचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकर्‍यांच्या लढ्याला मालोजीराजे यांचा पाठिंबा !

सुरत चेन्नई महामार्ग मध्ये ज्या बाधित शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतकर्‍यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी अक्कलकोट संस्थांनचे राजे मालोजी राजे यांनी उपस्थित राहून त्या शेतकर्‍यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचे मत व्यक्त केले

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!