अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात प्रभाग क्रमांक एक ज्या तऱ्हेने राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो, त्याच प्रभागात सामाजिक कार्यकर्ते तम्मा (मामा) शेळके यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करताच प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे. कोणत्याही परिस्थितीत विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, या घोषणेनंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास अजून चार दिवसांचा अवधी असला, तरी शहरात सध्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. शेळके यांच्या नावाला सर्व स्तरातून मिळणारा पाठिंबा पाहता त्यांची उमेदवारी भाजपकडून जवळपास निश्चित मानली जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन
कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी अधिकृत पणे आपली मुलाखत देऊन आपण पक्षाकडून इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे.
राजा शिवछत्रपती बहुउद्देशीय सामाजिक समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून १९९४ पासून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. तब्बल तीन दशकांपासून त्यांनी विविध उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावातून स्वतःला सिद्ध केले आहे. आजही ते पूर्णवेळ समाजकार्यासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
अक्कलकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार विशेष महत्त्वाचा ठरला आहे. या कार्यासाठी त्यांनी एक व्रत घेतले होते“जोपर्यंत पुतळा बसत नाही, तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही.” त्यांचा हा दृढनिश्चय आता अंतिम
टप्प्यात असून, लवकरच त्याचे फलित शहरवासीयांसमोर येणार आहे.
मराठा समाजासह सर्व समाजघटकांशी त्यांचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध आहेत. विविध धर्मीयांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका पाहता, एक सर्वसमावेशक आणि सर्वांना जोडून ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक एक मध्ये त्यांची लोकप्रियता मोठी आहे.
शेळके यांच्या मंडळामार्फत अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम राबवले जातात. रक्तदान शिबिर, आरोग्य साहाय्य आणि गरजू रुग्णांना मदत अशा विविध मार्गांनी त्यांनी लोकांना दिलासा दिला आहे. त्यांच्या कार्याचा स्पर्श थेट सामान्य नागरिकांच्या जीवनाला झाला आहे.
अक्कलकोट शहरात शिवजयंती भव्य स्वरूपात साजरी करण्याची परंपरा त्यांनी कायम जपली आहे. इतिहास उजाळा देणे, सर्व धर्मीयांना एकत्र आणणे आणि शिवछत्रपतींची प्रेरणा समाजमनात दृढ करणे, हे त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या उपक्रमातून सिद्ध केले आहे.
शेळके यांची आणखी एक ओळख म्हणजे त्यांचे घर २४ तास सर्वांसाठी खुले असते. त्यांचे सुपुत्र इंजिनियर वरूण शेळके देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकत हे कार्य सुरू ठेवले आहे त्यांच्या कार्याचा फायदा देखील त्यांना होणार आहे. गोरगरीबांना संकटसमयी आधार देणे, मयत व्यक्तींच्या कुटुंबांना मदत करणे, गरजूंच्या लग्नासाठी हातभार लावणे ही त्यांची सततची सेवा आहे. हीच मानवतावादी ओळख आज त्यांना प्रभागात अधिक सक्षमपणे उभे करते.
विशेष म्हणजे, गेल्या शिवजयंतीला त्यांनी मुस्लिम समाजातील प्रतिनिधींना अध्यक्षस्थानी बसवून एक वेगळा आणि सकारात्मक सामाजिक संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियता आणि बहुजनहितवादी विचारांचे ते अनुकरण करत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. अशी कृती करणारे ते तालुक्यातील मोजके व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्षपद ही मुस्लिम समाजाला देऊन सामाजिक एकतेचा संदेश त्यांनी या कार्यातून दिला आहे.
यामुळेच प्रभाग क्रमांक एक मध्ये तम्मा (मामा) शेळके यांच्या उमेदवारीला लोकांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला आहे. उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर व्हायची असली, तरी त्यांच्या बाजूने असलेल्या लाटेमुळे त्यांचा विजय “जवळपास नक्की” मानला जात असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून
येत आहे.