ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तानाजी सावंत कुटुंबातील राजकीय दरी उघड, भाजपात प्रवेशाने जिल्हा राजकारण तापले

सोलापूर : वृत्तसंस्था

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील अंतर्गत राजकीय मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत आणि पुतणे धनंजय सावंत यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हा प्रवेश केवळ पक्षांतरापुरता मर्यादित न राहता सावंत कुटुंबातील दरी स्पष्ट करणारा ठरला आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच हा राजकीय धक्का बसल्याने शिवसेना शिंदे गटासाठी ही बाब चिंतेची ठरू शकते. धनंजय सावंत यांना भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीची उमेदवारीही जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

खरं तर गेल्या काही महिन्यांपासून सावंत कुटुंबात राजकीय मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धनंजय सावंत यांनी स्वतंत्र मोर्चेबांधणी करत कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये प्रचाराची दिशा ठरवली जात होती. विशेष म्हणजे या प्रचार बैठकींसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर आमदार तानाजी सावंत यांचा फोटो नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

एकीकडे आमदार तानाजी सावंत हे भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेत असताना, दुसरीकडे धनंजय सावंत हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळत धनंजय सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिंदे गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सावंत कुटुंबातील हा राजकीय पेच जिल्हा परिषद निवडणुकीत कोणतं नवं वळण घेणार, आणि याचा थेट फटका शिंदे गटाला बसणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!