नवी दिल्ली वृत्तसंस्था : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे भारतातील पहिले क्रीडा व्यक्तिमत्त्व ठरले आहेत, ज्यांच्या प्रसिद्धी आणि व्यक्तिमत्त्व हक्कांना (Personality Rights) न्यायालयीन संरक्षण मिळाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सेलिब्रिटींच्या नाव, फोटो आणि ओळखीच्या गैरवापराला मोठा आळा बसणार आहे.
न्यायालयाने मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना सुनील गावस्कर यांच्याविषयी पसरवली जाणारी चुकीची व दिशाभूल करणारी विधाने तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. तसेच ई-कॉमर्स वेबसाइट्सना गावस्कर यांच्या नाव, फोटो किंवा ओळखीचा अनधिकृत वापर करणारी उत्पादने ७२ तासांच्या आत हटवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
गेल्या आठवड्यात गावस्कर यांच्या वकिलांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षणासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या नावाचा, प्रतिमेचा व ओळखीचा परवानगीशिवाय व्यावसायिक वापर होत असल्याचा मुद्दा न्यायालयासमोर मांडण्यात आला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ मे २०२६ रोजी होणार आहे.
पर्सनालिटी राइट्स अंतर्गत कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या नाव, फोटो, आवाज आणि ओळखीवर नियंत्रण ठेवण्याचा तसेच त्याच्या वापरातून होणाऱ्या लाभांवर हक्क राखण्याचा अधिकार असतो. सुनील गावस्कर प्रकरणातील हा निर्णय भारतीय कायदेव्यवस्थेत मैलाचा दगड ठरणार असून, प्रसिद्ध व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणाला नवी दिशा देणारा ठरेल.