मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणूक जशी जशी जवळ येत आहे. तसे तसे महायुतीत तणाव होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू आहे. भाजपने मुंबईत ‘150 प्लस’चा नारा दिला असून, ठाण्यात शिवसेना अधिक जागांवर दावा करत आहे.
भाजपने मुंबई महानगरपालिकेत (BMC) सर्वाधिक जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्यामुळे, त्यांनी ‘150 प्लस’चा नारा दिला आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) सुमारे 40 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे शिवसेनेला कमी जागांवर समाधान मानावे लागेल.
ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचा पारंपरिक प्रभाव आहे. 2017 च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने 67 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपने 34 जागा मिळवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाण्यात अधिक जागांवर लढण्याचा दावा करत आहे.
भाजपने मुंबई, पुणे आणि ठाणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे. महायुतीतील जागावाटपावर एकमत नसल्यामुळे, ‘फ्रेंडली फाइट्स’ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही ठिकाणी ‘फ्रेंडली फाइट्स’ होऊ शकतात, असे संकेत दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि इतर शहरांमध्ये निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीतील जागावाटपावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आपापल्या प्रभावाच्या भागांवर अधिक जागांचा दावा करत आहेत. भाजपने काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा विचार केला आहे, त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढला आहे.