मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असतांना आज शनिवारी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. कोणीही बेसावध राहू नका, शमीच्या झाडावरील शस्त्रे आता उतरवा, ही क्रांतीची वेळ आली आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सगळ्यांचा तुम्हाला आता वेध घ्यावा लागणार असल्याचे आवाहन देखील राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
दसऱ्याच्या दिवशी सोने लुटले जाते. मात्र आपण आपट्याची पाने वाटत राहतो आणि आपट्याची पानेच आपल्या हातात राहातात. या व्यतिरिक्त काहीही राहत नाही. आपण या लोकांकडे लक्ष देणार कधी? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आजचा दसरा अत्यंत महत्त्वाचा आणि निवडणुकीच्या तोंडावर आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरवर्षी तुम्ही बेसावध राहाता आणि सर्व राजकीय पक्ष आपापले खेळ करत राहतात. या सर्वात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ रस्ते बांधणे आणि उड्डाणपूल उभे करणे ही प्रगती नसते. आपल्या हातात मोबाईल आला म्हणजे प्रगती नसते. तर प्रगती ही बुद्धीतून व्हावी लागते. प्रगती ही समाजाची होणे आवश्यक असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
अनेक वर्षांपासून प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्यातला राग व्यक्त होत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याच – त्याच लोकांना का वारंवार निवडून दिले जात असल्याचे देखील ते म्हणाले. आणि नंतर पश्चाताप व्यक्त करत राहायचे. पांडवांनी जशी शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती तशी आणि मोक्याच्या वेळेला तुम्ही तुमची शस्त्र झाडावर नेऊन ठेवत आहात. मतदानाच्या दिवशी या शास्त्राचा वापर करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुका संपल्यानंतर तुम्ही शस्त्र बाहेर काढता आणि या सर्व लोकांवर बोलत राहतात. मग मतदानाच्या दिवशी काय होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
हा माझ्या जातीचा, हा माझ्या ओळखीचा, असे जर करत बसला तर राष्ट्र उभे राहत नाही. आजपर्यंत तुम्ही सर्वांना संधी दिली आहे. आपलाही उद्या मेळावा होणार आहे, त्यावेळेस मी सर्व विषयांवर मी तुमच्याशी बोलणारच आहे. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी क्रांती करायला हवी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. आजपर्यंत तुम्ही ज्यांना सांभाळले, त्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली आहे. मतदारांना कायम गृहीत धरले गेले आहे. हे गृहीत धरणारेच महाराष्ट्राचे नुकसान करणारे असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे दसऱ्यानंतरच्या निवडणुकीत बेसावध राहू नका. शमीच्या झाडावरची शस्त्र आता खाली उतरवा. ही क्रांतीची वेळ आहे. ही वचपा घेण्याची वेळ आहे. आताच ती शास्त्री उतरवून या सर्वांचा वेध घ्यावा लागणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. गेली पाच वर्षे तुमच्या मतांशी ज्यांनी प्रतारणा केली, ज्यांनी मतांचा अपमान केला, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरले, वेडी वाकडी युती आणि आघाड्या करत बसले. ते आज संध्याकाळी मेळाव्यातून एकमेकांची उणीदुणी काढतील. मात्र, त्यांच्यात मतदार कुठे असेल? महाराष्ट्र कुठे असेल? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. मी अनेक वर्षापासून एका महाराष्ट्राचे स्वप्न पाहतोय. त्यासाठी संधी देण्याची विनंती देखील राज ठाकरे यांनी केली. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला घडवायचा असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.