मुंबई वृत्तसंस्था
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वचननामा जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज वचननामा जाहीर केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काल मविआची सभा यशस्वीरीत्या पार पडली. आम्ही मतं मागायची आणि लोकांनी द्यायची असं मला पटत नाही. लोकांनी आम्हाला का मतं द्यायची. काल आम्ही पंचसूत्री जाहीर केली. आजपासून मी महाराष्ट्र फिरतोय. १० तारीखला पत्रकार परिषद होऊ शकते. त्यांनी मला सांगितलं काल. पण त्या दिवशी कदाचित मी नसेल. त्यामुळे लगेच महाविकास आघाडीत बिघाडी असं नाही.’ ‘२०२० ची पालिका निवडणूक होती. तेव्हा वचननामा जाहित केला होता. मुंबईसाठी सागरी मार्गाचं आश्वासन दिलं होतं. मला अभिमान आहे ते आम्ही पूर्ण करून दाखवलं. मालमत्ता कर माफ करणार जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं. शिवभोजन थाळी सुरू केली. हा वचननामा दोन प्रकारात असेल. फार काही वेगळा वचननामा नाही. पण थोडी फार काही वचने आहेत ती दिली जातील.मविआच्या इतर पक्षांना देखील मान्य आहे. मविआचा देखील वचननामा येईल.धारावीत आम्ही वित्तीय केंद्र उभारु. तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करू. गृहनिर्माण धोरण तयार करू.’.
ठाकरेंच्या वचननाम्यातील घोषणा
संस्कार – प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, देखणे आणि प्रेरणादायी मंदिर उभारणार.
अन्नसुरक्षा – शेतकऱ्यांचे नुकसान होवू न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव ५ वर्षे स्थिर ठेवणार.
महिला – महिलांना मिळणारे सरकारी अर्थसहाय्य वाढवणार, प्रत्येक पोलीस स्टेशन बरोबरीने स्वतंत्र २४४७ महिला पोलीस ठाणे सुरु करणार. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
आरोग्य – प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
शिक्षण – जात-पात-धर्म-पंथ न पहाता, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मुलींप्रमाणे मोफत शिक्षण देणार.
पेन्शन – सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
शेतकरी – ‘विकेल ते पिकेल’ धोरणानुसार बळीराजाच्या पीकाला हमखास भाव मिळवून देणार.
वंचित समूह – वंचित समूहांच्या हक्कांच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार.
मुंबई – धारावीकरांना त्यांच्या उद्योगांच्या सोयींसह राहतं घर तिथल्या तिथे देणार, मुंबईतील आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी जागतिक दर्जाचे आर्थिक व औद्योगिक केंद्र उभारणार.
उद्योग – बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार, निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.