मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याद्वारे महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत मुख्यमंत्रीपदावरून कोणतीही रस्सीखेच सुरू नसल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी यासंबंधी आपल्या मित्र पक्षांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. मविआतील काँग्रेस व शरद पवारांच्या पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला तरी माझी हरकत नाही. त्याला मी येथेच पाठिंबा जाहीर करतो. कारण, ही निवडणूक महाराष्ट्राची अस्मिता जपणारी असून, कोणत्याही स्थितीत महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचायचे हाच आमचा निर्धार आहे, असे ते म्हणालेत.
ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कोणतेही मतभेद नाहीत. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा. मी येथेच त्याला पाठिंबा जाहीर करतो. कारण आताची लढाई महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारी आहे. महाविकास आघाडी आजपासून पुढल्या लढाईला सुरुवात करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. होऊ द्या घोषणा. आम्ही निवडणुकीसाठी तयार आहोत. आपण लोकसभेला राजकीय शत्रूला पाणी पाजली. लोकसभेची निवडणूक संविधानाची रक्षणाची होती. लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आताची लढाई महाराष्ट्रधर्म रक्षणाची नाही. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान व महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची आहे. जे महाराष्ट्र लुटण्यास आलेत. आता एक तर तू राहशील किंवा मी राहील या जिद्दीने आपल्याला ही लढायची आहे. होऊन जाऊ द्या. पण ही स्थिती आपल्या मित्रपक्षांत उद्भवणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, पण यांना खाली खेचू या निर्धाराने आपल्याला पुढे जायचे आहे, असे ते म्हणाले.