लातूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून त्यापुर्विच एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या देखील फैरी सुरु झाल्या आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लातूर जिल्ह्यामध्ये जनसंवाद दौरा पार पडत आहे. यावेळी औसा येथे झालेल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला.
“ओमराजे निंबाळकर आणि कैलास सोळुंके यांचे मी कौतुक करतो. कैलास सोळंके पळून घेऊन जाताना एकटे उतरून आले हा शिवसेनेचा वाघ आहे. आमदार, खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपत नाही हे भाजपच्या आता लक्षात आले आहे. मणिपुर पेटले तिकडे अमित शहा जात नाहीत, त्यांची हिंमत नाही ते महाराष्ट्रात येतात महाविकास आघाडीवर बोलतात. मात्र महायुतीचे ट्रिपल इंजिन सरकार भ्रष्टाचाराचे चाक लागलेले इंजिन आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच “निवडणुकीपुरता तुम्हाला परिवार आहे ते कळाले आहे. पण मी माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणलं जबाबदारी घेतली. शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं तर बँका तुमच्या मागे लागतात. म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. त्यांचे रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, मात्र निवडणूक रोख्यांमधून हजारो कोटी रुपये भाजपने जमवले त्याचे रेकॉर्ड नाही का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहिराती साठी 84 कोटी रुपये खर्च केले आहे. आम्ही काम खूप केली मात्र जाहिराती करत बसलो नाही. आम्ही कर्जमुक्त केली याची कुठेही जाहिरात केली नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आम्हाला गर्व आहे पण आम्ही मोदींचे अंधभक्त नाहीत, अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली.