पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर मोठ्या अडचणीत आल्याचे दिसत असतांना आता पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशातच रुपाली चाकणकर यांच्या काळात महिलांना अपेक्षित असलेला न्याय मिळत नसल्याने अनेक महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे.
तसेच रुपाली चाकणकर या पार्ट टाईम अध्यक्षा असल्याची बोचरी टीका करत अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्ज केला आहे. तर दुसरीकडे आता करुणा शर्मा-मुंडे यांनी या वादात उडी घेत हिरारीने उतरल्या आहेत. ज्या 35 हजार महिलांना तुम्ही न्याय दिला, त्या समोर आणा, अन्यथा आम्ही त्याच महिलांना घेऊन महिला आयोगावर मोर्चा काढू, असा थेट इशारा करुणा शर्मा यांनी दिला आहे.
काय म्हणाल्या करुणा शर्मा?
करुणा शर्मा म्हणाल्या, महिला आयोगाकडे 901 महिलांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यातील किती महिलांना तुम्ही न्याय दिला. पक्षासाठी फिरण हे रुपाली चाकणकर यांचे काम नाही तर महिला आयोगाकडे येणार्या तक्रारींना न्याय देणं हे काम आहे, असा टोला करुणा शर्मा यांनी चाकणकरांना लगावला. तसेच रुपाली चाकणकर यांना माज आहे म्हणून चिल्लर असा शब्द त्यांच्याकडून वापरला जातो, न्यायासाठी महिला आयोगाकडे जाऊन सुद्धा न्याय मिळत नसल्याने आता करुणा शर्मा यांच्याकडे आपली तक्रार घेऊन या पीडित महिला येत आहेत. या पार्श्वभूमीवर करुणा शर्मा यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपण न्याय दिलेल्या 35 हजार महिलांना समोर आणा. अन्यथा त्याच महिलांना समोर आणून आम्ही महिला आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा करुणा शर्मा यांनी रुपाली चाकणकर यांना दिला आहे. रुपाली चाकणकर फक्त सुंदर दिसतात म्हणून त्यांना महिला आयोगाचे पद दिले आहे, असा गंभीर आरोप देखील करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.