ध्यास विश्वसार्ह बातमीचा

म्हणून काश्मिरातील दहशतवाद घटला – गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू व काश्मिरातील दहशतवादाच्या घटना ६६ टक्क्यांनी घटल्या असून नागरी हत्याकांड ८१ टक्क्यांनी कमी झाले, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केला. जम्मू-काश्मीरला पर्यटन केंद्रात रूपांतरित करण्याचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असेही शाहांनी सांगितले. काश्मीरच्या युवकांनी मतदार म्हणून आपले नाव नोंदवावे व लोकशाहीचा भाग बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जम्मू येथील १०० ई-बसेसला हिरवी झेंडी दाखवली. तसेच त्यांनी खोऱ्यातील प्रशासकीय सेवेतील अधिकारी तथा अनुकंपा आधारे नोकरी मिळवलेल्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी शाह म्हणाले की, कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरातील दहशतवादाच्या घटना ६६ टक्के, नागरी हत्याकांड ८१ टक्के व सुरक्षा दलातील जवानांच्या हत्येचे प्रमाण ४८ टक्क्यांनी घटले. यावरून जम्मू-काश्मीरमध्ये आनंद, शांतता व सामान्य स्थितीचे नवे युग सुरू झाले आहे. २००० मध्ये काश्मिरात दगडफेकीच्या २६५४ घटना घडल्या. पण २०२३ मध्ये अशी एकही घटना घडली नाही. तसेच कोणीही बंद पुकारला नाही, असा दावा अमित शाह यांनी केला.

काश्मीरमध्ये २०१० साली दगडफेकीत ११२ नागरिक मरण पावले. पण, गतवर्षी अशा घटनांत एकही मृत्यू झाला नाही. काश्मिरात टेरर फंडिंगला लगाम घालण्यात यश आले. अतिरेक्यांची मालमत्ता जप्त केली जात आहे. त्यांच्या कारवायांना विराम लावण्यासाठी बंदीचे पाऊल उचलले जात आहे. खोऱ्यात बॉम्बस्फोट, गोळीबार, दगडफेक व बंदचे युग संपले. त्याची जागा शिक्षण, शाळा, महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, व्यवस्थापन संस्था, उद्योग व इतर पायाभूत संरचनांनी घेतली असून हे मोठे परिवर्तन आहे, असे अमित शाहांनी नमूद केले. दरम्यान, जम्मू-काश्मिरात २०१९ ते २०२३ पर्यंत तब्बल २१५३ कोटींची गुंतवणूक झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!