मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहे. यातीलच महत्त्वाचा मोर्चा मुंबईत काढण्यात आला. मात्र, या मोर्चाकडे अनेक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात सातत्याने आवाज उठवणारे आमदार सुरेश धस देखील या मोर्चाला उशिरा पोहोचले. तोपर्यंत मोर्चाचा समारोप झाला होता. या संदर्भात सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मानसे कमी असले तरी या प्रकरणात समाजाची भावना महत्त्वाची असल्याचे धस यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत समाज मन शांत होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, कधी कधी माणसे कमी येत असतात. मात्र, माणसे कमी किती आले यापेक्षा त्यांच्या आतील भावना लोकांपर्यंत गेल्या, यातच आमचे समाधान आहे. सरकारला खडबडून जागी करण्यासाठी या मोर्चाचा आयोजन करण्यात आले होते. मात्र, माणसे कमी आली यात काही आयोजकांच्या चुका असतील, मेगाब्लॉक असेल किंवा इतर अनेक कारणे असतील. कारण काहीही असो, जनतेच्या भावना सर्वांसमोर पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे धस यांनी म्हटले आहे.
या संदर्भात आमदार सुरेश धस म्हणाले की, जनतेच्या मनाला लागलेले हे प्रकरण आहे. हा 14 कोटी जनतेच्या मनातील राग आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल, तेव्हाच समाजमन शांत होईल. तोपर्यंत कोणालाही समाधान लागणार नसल्याचे धस यांनी म्हटले आहे. सात तासांचा प्रवास करून मी या ठिकाणी पोहोचलो आहे. मी फ्रेश होण्यासाठी गेलो होतो. मात्र, मी परत आलो तेवढ्या वेळात कार्यक्रम संपला होता. मात्र त्यात गैर काहीही नाही. मी माध्यमांच्या माध्यमातून माझी मागणी सर्वांपर्यंत पोहोचवली असल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.