ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीवरून अक्कलकोट तालुक्यातील वातावरण तापले;चिमणीच्या समर्थनार्थ ३ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक

अक्कलकोट, दि.२९ : हरित लवादाने सिद्धेश्वर कारखान्याला पाठविलेल्या नोटिसीनंतर अक्कलकोट तालुक्यातील वातावरण चिघळले असून याचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या ३ डिसेंबर रोजी( शनिवारी ) सकाळी १० वाजता सर्जेराव जाधव सभागृहात पुढील दिशा ठरविण्यासाठी सिद्धेश्वर कारखान्याच्या समर्थनार्थ महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, विविध गावचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, विविध संस्था व त्यांचे पदाधिकारी,संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करण्यात येणार आहे. त्या संदर्भात त्यांना निमंत्रणही देण्यात येत असून या बैठकीत सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडू नये यासाठी पुढील दिशा ठरवली जाणार आहे. बैठकीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदनही देण्यात येणार आहे. यात सिद्धेश्वर कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

तरी या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे,असे आवाहन सिद्धेश्वर कारखाना बचाव समितीच्या वतीने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आणि पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!