अक्कलकोटमध्ये आता स्टार प्रचारकांच्या सभांनी वातावरण तापणार
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभांची जोरदार तयारी
अक्कलकोट : मारुती बावडे
तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले असताना अक्कलकोट आणि दुधनी येथे भाजप–शिवसेना (शिंदे गट)–काँग्रेस यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर आता तिन्ही पक्षांनी स्टार प्रचारकांच्या सभांचा मारा सुरू करण्याची जोरदार तयारी चालवली असून पुढील काही दिवसांत अक्कलकोटचे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
विश्वसनीय पक्ष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपकडून मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अक्कलकोटमधील जाहीर सभेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची दुधनी किंवा मैंदर्गी येथील सभा निश्चित मानली जात आहे. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांच्या सभा तिन्ही नगरपरिषदांमध्ये घेण्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात वेगाने सुरू आहे.
शिवसेना शिंदे गटाकडूनही तितक्याच भव्य तयारीचा धडाका देण्यात येत असून रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अक्कलकोटात जाहीर सभा घेणार आहेत. याशिवाय रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे आणि इतर प्रमुख नेते यांच्या सभांचे नियोजन सुरू असून पक्ष नेतृत्व त्यासाठी खास रणनीती आखत आहे.
काँग्रेसकडूनही तितकेच जोरदार तयारीचे चित्र आहे. माजी मंत्री सतेज पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते मोहम्मद अझहरुद्दीन, खासदार प्रणिती शिंदे तसेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सभा अक्कलकोट आणि परिसरात लागणार असल्याचे काँग्रेसच्या गोटातून समजते. त्यामुळे पारंपरिक काँग्रेस मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
तिन्ही पक्षांकडून उच्च पातळीवरील नेत्यांची उपस्थिती निश्चित मानली जात असून शहरात प्रथमच अशा प्रमाणात तिरंगी लढत होत असल्याने राजकीय वातावरण शिगेला पोहोचले आहे. स्थानिक पक्ष कार्यालयांमध्ये सभा व्यवस्थापन, ठिकाणांची पाहणी, कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी यासाठी चढाओढ सुरू आहे.
सभांच्या तारखा ठरवण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडून सतत बैठकांचे सत्र सुरू असून पुढील एक–दोन दिवसांत याबाबतचे अंतिम वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. तथापि, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या सर्व नेत्यांच्या सभा निश्चित असून गरजेनुसार तारखांत किरकोळ बदल होऊ शकतात, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. आगामी चार–पाच दिवसांत अक्कलकोटच्या राजकारणात स्टार प्रचारकांची धडाकेबाज एन्ट्री होणार असल्याने मतदारांचेही लक्ष आता फक्त सभांकडे लागून राहिले आहे.