ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात ग्रामीण सत्तेची लढाई; जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांत ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर आज ही प्रक्रिया पार पडत आहे. प्रत्येक मतदाराला पांढऱ्या ईव्हीएमवर जिल्हा परिषदेसाठी आणि गुलाबी ईव्हीएमवर पंचायत समितीसाठी अशी दोन मते द्यावी लागत आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात एकूण २ कोटींहून अधिक मतदार असून २५ हजार ४७१ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ७३१ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या १ हजार ४६२ गणांसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी १ लाख २८ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

दरम्यान, काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर मतदान केंद्रावर काही वेळ ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मात्र तांत्रिक तज्ज्ञांनी तत्काळ दुरुस्ती करून मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू केली.

छत्रपती संभाजीनगर येथील पिसादेवी परिसरातील बुथ क्रमांक १५, खोली क्रमांक ५ मधील ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे सुरुवातीला मतदानास विलंब झाला. मशीनमध्ये बिघाड असल्याने मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या असून पर्यायी मशीन आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथे मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून देशमुख कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वैशालीताई देशमुख, काँग्रेस नेते तथा माजी आमदार धीरज देशमुख आणि दीपशिखा देशमुख यांनी आपल्या मूळ गावी बाभळगाव येथे मतदान केले.

एकूणच ग्रामीण भागातील सत्तेचा फैसला करणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून मतदानाचा टक्का आणि निकालांमधून राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!